पाटण प्रतिनिधी | पाटण शहरातील नवीन बसस्थानकासमोर डंपर व मालवाहतूक करणारा या दोन ट्रकच्या मध्ये दुचाकीस्वार चिरडला गेल्याने दुचाकीस्वार रत्नदिप विलास वाघमारे (वय ४०, रा. कोरेगाव, सातारा) हे गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या अपघातात दुचाकी स्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी तातडीने सातारा येथील हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघाताची नोंद उशिरा पाटण पोलिसात झाली आहे. या अपघातामुळे कराड- चिपळूण रस्त्यावरील वाहतूकीची पाऊण तास कोंडी झाली होती.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव येथील रत्नदिप विलास वाघमारे हे आपली दुचाकीवरून (क्र. एम. एस. ११. ई. ३६१५) पाटण येथे कामानिमित्त आले होते. शुक्रवार दि. २० रोजी कराड-चिपळूण राज्यमार्गावरील पाटण शहरातील नवीन बसस्थानकासमोरील सेवा मार्गावर पाटणच्या बाजूने कोयनानगरच्या दिशेने निघालेला डंपर (क्र. एम. एस. १०. ए. डब्ल्यु. ७३३३) व मालवाहतूक करणारा ट्रक (क्र. के. ए.०६. ए. बी. ४५००) या दोन्ही वाहनांच्या मधोमध आल्याने दुचाकीवार चिरडले गेले. यात दुचाकीवरील वाघमारे नामक व्यक्ती यांनी डोक्याला हेल्मेट लावले होते.
हेल्मेटचे तुकडे झाले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघानानंतर स्थानिक नागरीकांनी वाघमारे यांना तात्काळ रिक्षामधून पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी सातारा येथील हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान, अपघातात मागील ट्रक क्लिनर बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. रस्त्याच्या मधोमध अपघात झाल्याने कराड-चिपळूण राज्यमार्गावर दोन्ही बाजूकडून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक कोंडी झाली होती. बघ्यांचीही मोठी गर्दी झाल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. या अपघाताची माहिती मिळताच सपोनि संजय राऊत, वाहतूक पोलीस अधिकारी राजेंद्र नलवडे, पोलीस कर्मचारी उमेश मोरे, वैभव पुजारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व वाहतूक सुरळीत केली. अपघाताचा पंचनामा केल्यानंतर अपघातची नोंद उशिरा पाटण पोलिसात करण्यात आली.