कराड प्रतिनिधी | कराड शहरात एका महिला डॉक्टरची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. शुल्क विभागातून बोलत असल्याचे सांगत तोतयांनी कराडातील डॉ. प्रणोती रूपेश जडगे यांना तब्बल सोळा लाख रुपयांना गंडा घातला. दिल्ली विमानतळावर पकडलेल्या साहित्यात तुमच्या नावाचे पासपोर्ट आणि ड्रग्ज सापडल्याचे सांगून गुन्हा दाखल करण्याची भीती घालत या डॉक्टरच्या बँक खात्यावरील रक्कम संबंधित तोतयांनी स्वत:च्या बँक खात्यावर हस्तांतरित करून घेतली. याबाबत डॉ. प्रणोती जडगे यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरात राहत असलेल्या डॉ. प्रणोती जडगे यांना २० सप्टेंबरला सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला. संबंधिताने आपण इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कंट्रोल रूममधून सीमाशुल्क अधिकारी सुमीत मिश्रा बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावाचे दिल्ली ते मलेशियासाठीचे पार्सल विमानतळावर अडवून ठेवले आहे. त्यामध्ये १६ पासपोर्ट, ५८ एटीएम कार्ड आणि १४० ग्रॅम ड्रग्ज असून, तुमच्या नावाचे सर्व डिटेल्स त्या पार्सलमध्ये आहेत. त्यामुळे हा गुन्हा ज्या पोलिस ठाण्याला गुन्हा नोंदवला, त्या पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी बोला, असे त्या मिश्रा नावाच्या व्यक्तीने सांगितले, तसेच त्याने वसंतकुंज पोलिस ठाण्यातील सुनील कुमार या व्यक्तीशी फोन जोडून दिला. सुनील कुमार याने डॉ. जडगे यांना गुन्हा दाखल होण्याची भीती घालून न्यायालयाने तुमची सर्व बँक खाती गोठविण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले, तसेच दिल्ली न्यायालयाच्या नावे असलेल्या आदेशाची एक प्रत डॉ. प्रणोती जडगे यांच्या व्हॉट्सअॅपला पाठवून दिली.
या सर्व प्रकारामुळे डॉ. जडगे घाबरल्या त्यानंतर सुनील कुमार नामक व्यक्तीने त्यांना व्हिडिओ कॉल करून तुम्हाला यातून निर्दोष बाहेर पडायचे असेल, तर तुमच्या बँक खात्यामध्ये जेवढी रक्कम असेल तेवढी रक्कम रिझर्व्ह बँकेच्या खात्यामध्ये वर्ग करा, असे सांगितले. डॉ. जडगे यांनी त्यांच्या बँक खात्यातील १६ लाख २५ हजार १०० रुपये संशयितांनी दिलेल्या बँक खात्यावर ऑनलाइन हस्तांतरित केली.
रिझर्व्ह बँकेकडून चौकशी पूर्ण झाल्यानंतर ही रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा होईल, असे सुनील कुमार याने सांगितले होते. मात्र, त्यानंतर सुनील कुमार व सुमीत मिश्रा या दोघांचेही फोन लागले नाहीत, तसेच 45 त्यांच्याशी कसलाही संपर्क झाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास 5आल्यानंतर डॉ. प्रणोती जडगे यांनी आज याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून दोन अज्ञांताविरोधात गुन्हा दाखल करण्यात डीआला आहे. सहायक फौजदार सुभाष फडतरे तपास करीत आहेत.