कराड प्रतिनिधी | मसूर पोलिस व सातारा स्थानिक गुन्हेच्या पथकाकडून मंगळवारी एक धडक कारवाई करण्यात आली आहे. देशी बनावटीची पिस्तूल घेऊन येणाऱ्या एकास मसूर पोलिस व सातारा स्थानिक गुन्हेच्या पथकाने सापळा रचून कराड तालुक्यातील अंतवडी येथे रात्री पकडले. त्याच्याकडून एक देशी बनावटीची पिस्तूल, एक जिवंत काडतूस व दुचाकी असा एक लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संदेश सतीश ताटे (वय १९, रा. ओगलेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, मसूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मसूर ते शामगाव रस्त्यावर अंतवडी हद्दीत सापळा रचून दुचाकीवरून आलेल्या संदेश ताटेला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीची पिस्तूल, एक जिवंत काडतूस आढळून आले. त्याच्यावर मसूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पोलिसांच्या पथकाच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, लक्ष्मण जगधने, हसन तडवी, सनी आवटे, मुनीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, मनोज जाधव, धीरज महाडिक, अमृत कर्पे, वैभव सावंत, सहायक पोलिस निरीक्षक आदिनाथ खरात, महेश लावंड, अमोल पवार, महेश घुटुगडे, विक्रम पोतेकर यांनी सहभाग घेतला.