कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात आज चुरशीची मतदान पार पडले. दरम्यान, मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी पोलीस प्रशासनाने घेतली. मात्र, तालुक्यात जाळपोळीची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. दमदाटी करत एकाने ग्रामपंचायतीची घंटागाडी पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना उंडाळेत घडली. दरम्यान, नागरिकांनी प्रसंगावधान राखत आग विझवून पुढील अनर्थ टाळला. या घटनेची नोंद कराड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्यात येत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दररोज नेहमी प्रमाणे आज कराड उंडाळे येथे सकाळी उंडाळे ग्रामपंचायतीची घंटागाडी कचरा गोळा करून कचरा डेपोत कचरा टाकण्यासाठी घंटागाडीचा चालक गेला. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कचरा टाकुन कर्मचारी परत जात असताना उंडाळे येथील अंकुश रामचंद्र मुळीक याने घंटागाडी अडवून “आमच्या शेताजवळील गटर्स का साफ करत नाही, गटर्स साफ केल्याशिवाय कचरा येथे टाकायचा नाही म्हणून सांगितले आहे ना असे म्हणत घंटागाडीवर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न केला. तसेच घंटागाडीच्या चालकाला दमदाटी केली. त्यानंतर संशयिताने पेट्रोल ओतून सदर घंटागाडी पेटवून दिली.
सुदैवाने सदर घटनेत घंटागाडी वरील चालक बाळासाहेब कुंभार बचावले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेवढ्यात अंकुश मुळीक हा फरार झाला आहे. कराड पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याघटनेची फिर्याद ग्रामविकास अधिकारी शरद चव्हाण, सरपंच संगीता माळी, उपसरपंच अजित कदम, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पाटील व दादा पाटील यांनी दिली आहे. सदर ईसमावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे हवालदार सुनील माने करीत आहेत.