सातारा प्रतिनिधी | गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी सातारा शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील 97 जणांना तात्पुरत्या तडीपारीचा दणका दिला आहे. पोलिसांच्या या कारवाईने गल्ली बोळातील भाईगिरी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, 12 दिवसांची तात्पुरत्या तडीपारीची ही कारवाई आहे.
गणेशोत्सव निर्भयपणे पार पाडण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार 2024 या कालावधीत अवैध व्यवसाय करणारे व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल असणारे तब्बल 97 सराईत गुन्हेगार आहेत.
सातारा जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकीमध्ये त्यांनी वावर करू नये, परिसरात थांबू नये. कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा त्यांच्याकडून घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सातारा तहसिलदारांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 97 सराईत गुन्हेगारावर बी.एन.एस.एस. कलम 163 अन्वये 12 दिवसांसाठी तात्पुरते तडीपार करण्यात आले आहे.