सातारा प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत मिळत आहे. तरीही जिल्ह्यातील हजारो शेतकरी ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरणापासून दूर राहिल्याने त्यांना लाभ मिळत नव्हता. यासाठी राज्य कृषी विभागाने सुमारे ९० हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली. त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली आहे.
शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जात असलेल्या या योजनेचा सातारा जिल्ह्यातीलही शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे. या योजनेंतर्गत ४ लाख ६६ हजार २०० शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. याच शेतकऱ्यांनाही नमो योजनेचा लाभ देय आहे. मात्र, योजनेत नोंद असूनही ७५ हजार ६७६ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नव्हती. तसेच ७२ हजार ३२६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नव्हते. यामुळे संबंधित शेतकरी लाभापासून वंचित होते. यासाठी राज्य कृषी विभागाने पूर्ण तयारी करुन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पाऊल उचलले.
गावोगावी सभा, मेळावे घेत जनजागृती केली. त्यामुळे ४४ हजार १५१ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण करण्यात यश आले. तर ४५ हजार ९३८ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. यामुळे सुमारे ९० हजार शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. परिणामी वर्षाला त्यांच्या बॅंक खात्यावर १२ हजार रुपये जमा होणाार आहेत.
सातारा जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेंतर्गत ८ हजार ५१० शेतकऱ्यांनी स्वयंनोंदणी केलेली आहे. त्यांना या योजनेच्या लाभाच्या प्रतिक्रियेत आणण्याचे काम ८ दिवसांत युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले. त्याचबरोबर तालुकास्तरावर मान्यतेसाठी प्रलंबित १४ हजार १७६ शेतकऱ्यांचीही प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे. तर २० हजार ९१६ स्वयंनोंदणीकृत शेतकरी लाभऱ्श्यांची प्रक्रिया सुरू आहे.