कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस लागणीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत जास्त पसंती देत असल्याचे दिसून आले आहे.
गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नगदी पीक असलेल्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटले होते. यंदा चांगला पाऊस होईल, अशी आशा शेतकरी वर्गाला लागून राहिली आहे. त्यामुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी ज्या शेतकऱ्यांच्या शेतीला स्वतःचे पाणी उपलब्ध आहे. त्या शेतकऱ्यांनी ऊस लागणीस प्रारंभ केला आहे.
यावर्षी मान्सून लवकर येईल, असा अंदाज वर्तवण्यात आल्याने अनेक शेतकऱ्यांनी रोपांचे बुकिंग केले आहे. यावर्षी चांगला व्यवसाय होईल. पूर्वीपासूनच उसाची लागण उसाची कांडी पुरून करण्याची पद्धत पूर्वापार चालत आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून उसाची रोपे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.