कराड प्रतिनिधी | सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. कारखान्यातील २१ जागांसाठी कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि सांगली जिल्ह्यातील कडेगाव अशा पाच तालुक्यांतील ९९ मतदान केंद्रांवर उत्स्फूर्तपणे सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत चुरशीचे सुमारे 81 टक्के मतदान झाले.
सकाळी आठ वाजता पाच तालुक्यातील एकूण ९९ मतदान केंद्रावरून मतदानास प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यांमध्ये 19 टक्के मतदान झाले तर दुपारी 12 वाजेपर्यंत सरासरी 43 टक्के मतदान झाले आहे. एकूण 99 केंद्रांवर 32 हजार 205 मतदार बांधवापैकी 26081 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून मतदान देखील जास्त झाले.
एकूण मतदान केंद्रांपैकी अनेक ठिकाणच्या मतदान केंद्रावर सकाळी 8 ते 11 या वेळेत मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. तर तांबवे, कडेपुर, वाठार किरोली या गावातील मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी सर्वाधिक नोंदवली गेली.
सह्याद्रि सहकारी साखर कारखानाच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाले आहे. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे ८१ टक्के मतदान झालेले आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर कराड येथील मतदार संकलन केंद्रावर सर्व मतपेट्या संकलित करण्यात आल्या.
उद्या दि. ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामामध्ये मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी २५० मतमोजणी अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी उमेदवार त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आणि मतमोजणीसाठी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या जवळ अनावश्यक गर्दी करू नये व परवानगी दिलेल्या व्यक्तीशिवाय कोणीही येऊं नये. उमेदवार, त्यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी आणि नियुक्त केलेले मतमोजणी अधिकारी/ कर्मचारी यांच्या वाहनांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती कराडच्या बैल बाजाराच्या आवारामध्ये सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
मतदान केंद्रात वाहनांना प्रवेश असणार नाही. त्यामुळे वाहने आणू नयेत. मतमोजणी केंद्रामध्ये ओळखपत्रा शिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच मोबाईल आताण्यास परवानगी असणार नाही त्यामुळे कोणीही मोबाईल आणू नये. उमेदवारांनी मतमोजणी साठी नियुक्त केलेले मतमोजणी प्रतिनिधी हे मतदार यादीतील असणे आवश्यक आहे.
मतमोजणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार…
मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू झाल्यानंतर प्रथम 1 ते 50 टेबलवर 1 ते 50 मतदान केंद्रांच्या मतपेट्या मतमोजणी प्रतिनिधींच्या समोर उघडण्यात येऊन त्यातील मतपत्रिकांची मतदार संघ निहाय विभागणी करण्यात येईल आणि त्यानंतर मतदार संघ निहाय गठ्ठे करून प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल. सुरुवातीला गट क्रमांक 1 ते 6 या मतपत्रिकांची मोजणी होईल. त्यानंतर राखीव जागांच्या मतपत्रिकांची मोजणी होईल. पहिल्या फेरीत 50 मतपेट्यांची मोजणी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीत 51 ते 99 मतदान केंद्रावरील मत पेट्यांची मोजणी होईल. साधारणपणे दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे.
फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी जाहीर होणार…
फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे मतमोजणी ऐकण्यासाठी मतमोजणी केंद्राच्या परिसरात गर्दी करण्यात येऊ नये. मतमोजणी केंद्रावर पत्रकार कक्षाची व्यवस्था केलेली आहे. पत्रकारांमार्फत मतमोजणी बाबतची माहिती प्रसारित करण्यात येणार असल्याने मतमोजणी केंद्राच्या परिसरात आणि रस्त्यावर एकत्रितरित्या जमा होऊ नये. कार्यकारी दंडाधिकारी कराड यांनी मतमोजणी परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले असल्याने मतमोजणी परिसरात जमावाने एकत्र येऊ नये किंवा थांबू नये व अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन करण्यात येत आहे.
मतदान केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त…
मतदान केंद्रांमध्ये कराड तालुक्यातील ४९ गावांत ६८, कोरेगाव तालुक्यात ८ गावांत १५, सातारा तालुक्यातील ५ गावांत ६, खटाव तालुक्यातील ३ गावांत ५ आणि कडेगाव तालुक्यातील ३ गावांत ५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच त्या त्या मतदान केंद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.