सातारा प्रतिनिधी | राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्यात महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात स्वातंत्र्य दिनापर्यंत 5 लाख 12 हजार 367 महिला पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या महिलांना सुमारे 153 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे, तर केवायसी व इतर कमतरतांमुळे 8 हजार 735 महिलांचे अर्ज अपात्र ठरले असले तरी त्यांना कमतरता दूर करून पुन्हा अर्ज भरण्यासाठीची संधी देण्यात आली आहे.
राज्यातील महिला आणि मुलींना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अबलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा होण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यामध्ये 2.5 लाखांच्या आत उर्त्पींन्न मर्यादेस आर्थिक दुर्बल घटकांतील महिला तसेच कुटुंबातील अविवाहित 1 युवती यांच्या बँक खात्यात प्रतिमाह 1500 रुपये जमा होणार आहेत.
त्यानुसार स्वातंत्र्य दिनापर्यंत जिल्ह्यातील 5 लाख 21 हजार 102 महिलांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 5 लाख 12 हजार 367 महिला व युवती या योजनेस पात्र ठरल्या आहेत. या योजनेची अंमलबजावणी जुलैपासून होणार असल्याने जुलै व ऑगस्ट अशा दोन महिन्यांचा 3 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या महिलांसाठी जिल्ह्यात एकूण सुमारे 153 कोटी 71 लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून, 14 दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे लाभार्थी संख्या व अनुदानाची रक्कम आणखी वाढणार आहे.