सातारा प्रतिनिधी | मोटारसायकली चोरणाऱ्या तीन अट्टल चोरट्यांना बोरगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आयाज इसाक मुजावर (रा. तारगाव, ता. कोरेगाव), युनुस युसुफ (रा. नागठाणे, ता. जि. सातारा) आणि सागर संतोष पवार (सध्या रा. निसराळे, ता. सातारा, मूळ रा. श्रुंगारतळी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या ८ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
नागठाणे गावच्या हद्दीतील ए. के. लाईट हाऊस नावाच्या दुकानासमोरुन दि.१० डिसेंबर २०२३ रोजी रात्री हिरो कंपनीची मेस्ट्रो मॉडेलची पांढऱ्या रंगाची मोपेडची (एम. एच.११ बी. एक्स. १३७९) चोरी झाली होती. याप्रकरणी समीर संजय साळुंखे (रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांचे पथक गुन्ह्याचा तपास करत होते. त्यावेळी आरोपी हा चोरीस गेलेली मोटारसायकल घेऊन बोरगावला येणार असल्याची माहिती मिळाली.
बोरगाव पोलीस पथकाने सापळा रचून बोरगावच्या हद्दीत सातारा ते कराड बाजुकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर मोटारसायकलसह संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दोन साथीदारांच्या मदतीने मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तिघांना अटक करून सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातुन चोरलेल्या हिरो आणि हिरो होंडा कंपनीच्या ८ मोटारसायकली संशयितांकडून जप्त केल्या.
साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवीद्र तेलतुंबडे, पो. हे. कॉ. अमोल गवळी, अमोल सपकाळ, दादा स्वामी पो. ना. प्रशांत चव्हाण, दीपककुमार मांडवे, पो. कॉ. केतन जाधव, विशाल जाधव, संजय जाधव यांनी ही कारवाई केली.