घरफोडीत चोरीला गेलेल्या 15 तोळ्याच्या दागिन्यांसह 8 लाख 80 हजाराचा मुद्देमाल मूळ मालकास परत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ मे रोजी झालेल्या घरफोडीत १५ तोळ्याचे दागिने आणि रोख रकमेसह ८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. पोलिसांनी २४ तासात छडा लावून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता. कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मूळ मालकास मुद्देमाल परत करण्यात आला.

शाहुपूरी पोलीस ठाणेत तक्रारदार राजकुमार रामचंद्र उधानी (रा. ११७/९० लोखंडे कॉलनी, शुक्रवार पेठ, सातारा) यांच्या घरामध्ये अज्ञात इसमाने घरफोडी करुन तक्रारदार यांचे घरातील १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ९६ हजार रुपये रोख रक्कम चोरी करुन नेल्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणेस गु.र.नं.२४२/२०२४ भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा शाहुपूरी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासात उघड करुन आरोपीस अटक केली होती.

सदर आरोपीकडून १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व ९६ हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ८ लाख ८० हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला होता. हस्तगत केलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम आज मंगळवारी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या हस्ते तक्रारदार राजकुमार रामचंद्र उधानी (रा. ११७/९० लोखंडे कॉलनी, शुक्रवार पेठ, सातारा) यांना परत करण्यात आली.