पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील डोंगरमाथ्यावर वसलेल्या कोचरेवाडी येथील आठ गंजींना भीषण आग लागल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या आगीमध्ये 3 शेतकऱ्यांचे सुमारे 1 लाख 35 हजाराचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यापासून सुमारे 32 किमी अंतरावर डोंगरमाथ्यावर कोचरेवाडी हे गाव वसले आहे. गावात साधारण 109 कुटुंबे राहतात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावातील शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी कडबा व गवताच्या गंजी उभारल्या होत्या. मात्र, रविवारची दुपारी अचानक गंजींना आग लागली. अचानक एकापाठोपाठ गंजींना आग लागल्यानंतर अवघ्या काही तासात गंजी भीषण आगीत जळून खाक झाल्या.
कोचरेवाडीत भीषण आगीत 8 गवताच्या गंजी जळून खाक; 3 शेतकऱ्यांचे 1 लाख 35 हजारचे नुकसान pic.twitter.com/VSjouiJDIJ
— santosh gurav (@santosh29590931) March 25, 2024
निलेश रामचंद्र गुलगे यांच्या 5, मधुकर हरिबा गुलगे यांच्या 2 तर कृष्णत मोहिते यांची 1 अशा आठ गवताच्या गंजी शेजारी रचण्यात आलेल्या होत्या. या गंजींना दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. या घटनेनंतर पंचनामा देखील करण्यात आला नाही. या गंजीचा तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या वतीने करण्यात आली आहे.