सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्रातील बहुतांशी लोक हे शेतीवर अवलंबून आहेत. शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून शेतकरी शेळी-मेंढी तसेच गाय- म्हशीचे पालन करतात. यामध्ये राज्य शासनही राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेतून शेळी-मेंढी गटासाठी ७५ टक्के अनुदान देत आहे. यात एकदा अर्ज केला की पाच वर्षांत कधीही निवड होत असते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळांतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना राबविण्यात येते. यासाठी मेंढ्यांसाठी चराई अनुदान, शेळी- मेंढी पालनासाठी जागा खरेदी अनुदान, कुक्कुट पक्षांच्या खरेदी आणि संगोपनासाठी अनुदान मिळते. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. शेळी-मेंढी गटासाठीही ७५ टक्के अनुदान मिळते.
स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सुविधांसह २० मेंढ्या अधिक १ नर अशा गटाचे वाटप केले जाते. त्यामुळे या योजनेचा लाभ होत असतो.
अशी लागतात कागदपत्रे…
सक्षम अधिकाऱ्यांचा जातीचा दाखला, आधार आणि रेशन कार्ड, बँक पासबुक, मेंढीपालन करण्याच्या पद्धतीबाबत संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र, स्वयंघोषणापत्र, शेड बांधकामासाठी स्वतःची किमान एक गुंठा जागा उपलब्धतेचा सात बारा किंवा प्रमाणपत्र आदी.
२६ सटेंबरपर्यंत होती मुदत…
दरवर्षी योजनेसाठी अर्ज मागविले जातात. यावर्षी २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. शेळी-मेंढी पालन गटासाठी ७५ टक्के अनुदान मिळते. तर लाभार्थीना २५ टक्के सहभाग द्यावा लागतो.