सातारा प्रतिनिधी । राज्यात आगामी कालावधीत 1 कोटी लखपती दीदी करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत सातारा जिल्ह्यात महिला बचत गटांची चळवळ वेगाने वाढत आहे. शिवाय बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठाही करण्यात येत असल्यामुळे महिला स्वावलंबी होत आहेत. सातारा जिल्ह्यात सद्यस्थितीत ७१ हजार महिला लखपती दिदी झाल्या असून यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. उमेदच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाची एक नवी चळवळ उभी राहत आहे
दरम्यान, सातारा जिल्ह्यात मागील महिन्यात जिल्हा परिषद मैदानावर ‘मिनी सरस २०२५ मानिनी जत्रे’चे उद्घाटन व ‘महा आवास अभियान २०२४-२५’ जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री श्री. जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी एक महत्वाची घोषणा देखील केली आहे. खाद्यपदार्थांबरोबर विविध वस्तूंची निर्मिती करत असलेल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी सातारा शहरात मॉल उभारण्यात येतील.
या मॉलसाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करुन दिला जाईल. राज्य शासनाने 100 दिवसांचा कार्यक्रम ठरविला आहे. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 50 लाख महिलांना लखपती दिदी करणार असल्याची ग्वाही देखील मंत्री गोरे यांनी दिली आहे. आता याची प्रत्यक्ष कार्यवाही काही होणार हे पहावे लागणार आहे.
सातारा जिल्ह्यात 20 हजार 975 गट
सातारा जिल्ह्यात २०१९ पासून उमेद अभियान सुरू झाले आहे. सध्या जिल्ह्यात २० हजार ९७५ महिला बचत गट आहेत. या गटात किमान १० महिला आहेत. त्यामुळे दोन लाखांवर महिलांचे संघटन या बचत गटांद्वारे झालेले आहे.
90 हजारांचे उद्दिष्ट…
सातारा जिल्ह्याला २०२४-२५ वर्षात २० हजार ५६१ लखपती दिदी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. आतापर्यंत ७१ हजार लखपती दिदी झालेल्या आहेत. अजूनही महिलांना लखपती दिदी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
वर्षभरात 205 कोटींचे कर्ज महिला बचत गटांना वाटप
जिल्ह्यातील महिला बचत गटांना उद्योग, व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात बँकांच्या माध्यमातून कर्ज वाटप करण्यात येत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली २०२४-२५ वर्षात आतापर्यंत २०५ कोटींचे कर्ज वाटप झालेले आहे.
करोडपती बहीण म्हणजे काय?
संबंधित महिला किमान दोन व्यवसाय करत असावी. या व्यवसायातून वर्षाला किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळवायला हवे. यासाठी उमेद अंतर्गत प्रशिक्षणे, मार्केटिंग सुविधा पुरविण्यात येते. तसेच मालाच्या विक्रीसाठी प्रदर्शने भरविली जातात. यातून महिलांचे उत्पन्न वाढून लखपती होतात.