सातारा प्रतिनिधी । सध्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी शहरी भागात पानटपरीच्या आडोशाला गांजाचे झुरके घेणाऱ्यांची संख्या पाहायला मिळत आहे. अशा व्यसनाधीन झालेल्या ३९ जणांवर पोलिसांकडून गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तरुणाईमधील वाढती व्यसनाधीनता समाजासाठी चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे झटपट श्रीमंतीसाठी काहीजण शेतात गांजा अन् अफूची देखील झाडे लावत असल्याने अशांवर देखील पोलिसांकडून वर्षभरात कारवाया करण्यात आल्या आहेत.
गेल्या नऊ महिन्यांत स्थानिक गुन्हे शाखेने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून ५३ लाख ३२ हजारांची गांजा आणि अफूची झाडे जप्त केली आहेत, तसेच त्यामध्ये २० आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ३९ जणांवर गांजा आणि अफूचे सेवन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये महाविद्यालयीन तरुणांपासून व्यावसायिक, शेतकरी, नोकरदारांचाही समावेश आहे.
अंमली पदार्थांचे सेवन करणे व ते जवळ बागळणे, लागवड करणे हा गुन्हा आहे. मात्र, असे असतानाही अनेक जण झटपट पैशाच्या हव्यासापोटी उसाच्या शेतात गांजाची, तसेच अफूची लागवड करतात. हे अमली पदार्थ सुकवल्यानंतर छोट्या छोट्या पुड्या करून त्या पानटपरी, तसेच अन्य – दुकानदारांना विकल्या जातात. – त्यानंतर पुढे हे अमली पदार्थ तरुणांच्या हातात पोहोचतात. अशी एकंदरीत अमली पदार्थांची साखळी आहे. ही साखळी मोडीत काढण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने वारंवार कारवाया करून व्यसनाधीन झालेल्या लोकांना चांगलेच वठणीवर आणले, तर ज्यांनी शेतात गांजा, अफूची लागवड केली होती. त्यांच्याकडून ही झाडे जप्त करण्यात आली आहेत. गांजा आणि अफूच्या झाडाची लागवड होऊ नये यासाठी पोलिस प्रचंड सतर्क झाले आहेत.
23 लाख रुपये किंमतीची 113 किलो अफूची झाडे जप्त
सातारा जिल्ह्यात गट वर्षात मार्च महिन्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली होती. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली होती.