पाटण प्रतिनिधी | कोयना धरणाच्या तांत्रिक जलवर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत भलेही पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत पाऊस जादा पाण्याची आवकही झाली असली तरी चार जलविद्युत प्रकल्पातून 505.003 दशलक्ष युनिट इतकीच आतापर्यंत वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाणीवापर कमी झाल्याने तब्बल 159.231 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाल्याची तांत्रिक आकडेवारी आहे.
जलवर्षात आत्तापर्यंत तीन महिन्यात कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 10.47 टीएमसी पाण्यावर 486.043 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 13.97 टीएमसी वर 641.768 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 3.50 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 155.725 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.
पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. आत्तापर्यंत सिंचनासाठी सोडलेल्या 1.16 व पूरकाळातील 3.27 अशा एकूण 4.43 टीएमसी पाण्यावर 18.960 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचनासाठी सोडलेल्या 3.50, पूरकाळातील 2.52 अशा 6.02 टीएमसी पाण्यावर 22.466 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 1.59 टीएमसी पाणीवापर कमी झाला असून 3.506 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे.
चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आत्तापर्यंत तीन महिन्यांत एकूण 14.90 टीएमसी पाण्यावर 505.003 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी 19.99 टीएमसी पाण्यावर 664.234 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत 5.09 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 159.231 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.