पाटण प्रतिनिधी | मुसळधार पावसामुळे कोयना धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या धरणात 86 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उद्या शुक्रवारी कोयना नदी पात्रात विसर्ग वाढविण्यात येणार आहे.
कोयना धरणात गुरूवारी (१ ऑगस्ट) सायंकाळी ५ वा. एकूण ८६.१९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी अति मुसळधार पावसाची (रेड अलर्ट) शक्यता वर्तविली आहे. परिणामी धरणामध्ये पाण्याची आवक वाढणार आहे.
सद्यस्थितीत सांडव्यावरून कोयना नदीपात्रात ४०,००० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी ९ वा. सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ५०,००० क्युसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तसेच आवक पाहून विसर्गात वाढ करण्यात येईल.
शुक्रवारी विसर्ग वाढविल्यानंतर धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२,१०० क्युसेक्स होईल. त्यामुळे कोयना, कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असून प्रशासनाने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.