कराड प्रतिनिधी । संतोष गुरव
शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. आयडीमुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. त्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ३ लाख ४७ हजार २३१ शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यात कराड तालुक्याच्या तुलनेत पाटण तालुक्याने चांगले काम केले आहे. पाटण तालुक्यात एकूण ४४ हजार १७३ इतक्या शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
अॅग्रिस्टॅक प्रकल्पात प्रत्येक सातबाराधारक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी दिला जात आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खाते उताऱ्याला जोडण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावे सात-बारा नोंद आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक क्रमांक अनिवार्य आहे.
फार्मर आयडी काढण्यात पाटण तालुक्यात महसूल प्रशासनाचे चांगले काम : तहसीलदार अनंत गुरव
पाटण तालुक्यात अनेक दुर्गम अशी डोंगराळ भागात गावात वसलेली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी राहत असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना पोहचविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करत आहेत. राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमातून पाटण तालुक्यात ४४ हजार १७३ शेतकऱ्यांना फार्मर आयडीचे वाटप करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली आहे.
कोणत्या तालुक्यात आत्तापर्यंत किती नोंदणी?
जावळी : Farmer ID : 63453, : Farmer: 18643
कराड : Farmer ID: 240298, Farmer: 50395
खंडाळा : Farmer ID: 65274, Farmer: 16321
खटाव : Farmer ID: 184107, Farmer: 40103
कोरेगाव : Farmer ID: 110215, Farmer: 36560
महाबळेश्वर : Farmer ID: 30709, Farmer: 6735
माण : Farmer ID: 148161, Farmer: 36476
पाटण : Farmer ID: 157551, Farmer: 44173
फलटण : Farmer ID: 126886, Farmer: 35981
सातारा : Farmer ID: 175156, Farmer: 37593
वाई : Farmer ID: 82701, Farmer: 24351
एकूण ID : 1384511, Farmer: 347231
फार्मर आयडीसाठी आवश्यक कागदपत्रे
शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड, कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता येईल. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करणे ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल, यासाठी शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध होईल.
3 लाख 47 हजार शेतकऱ्यांना फार्मर आयडी
सातारा जिल्ह्यात १३ लाख ८४ हजार ५११ शेतकरी आहेत. त्यातील ४ लाख ४० हजार ६६३ शेतकऱ्यांनी पीएम किसानचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार २३१ शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आलेले आहेत.
कराड आणि पाटण तालुक्यात सर्वाधिक
सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कराड तालुक्यातील ५० हजार ३९५ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्यात आले आहेत. त्या पाठोपाठ पाटण तालुक्यात ४४ हजार १७३ एवढ्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढले आहेत.