पाटण प्रतिनिधी । महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळख असलेल्या कोयना धरणात सध्या ४५ हजार ६११ क्युसेक आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेला ५० हजार क्युसेक विसर्ग कमी करुन तो आज दुपारी 12 वाजल्यानंतर ४० हजारवर करण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा-कोयनेसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत घट होणार आहे. त्यामुळे नदीकाठी पुरापासून दिलासा मिळाला आहे.
दुपारी सांडव्यावरील विसर्ग कमी केल्यानंतर धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक्स असा झाला आहे. कोयना, कृष्णा नदी पात्राजवळील नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन आठवड्यापासून मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. कोयना धरणात पाण्याची आवक वाढल्याने पावसाळ्यात पहिल्यांदाच २५ जुलै २०२४ रोजी धरणाचे सहा वक्र दरवाजे उचलून १० हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यानंतर त्याच रात्री सात वाजता पुन्हा १० हजार क्युसेकने वाढ करुन नदीत २० हजार क्युकेस सोडण्यात आले.
कोयना धरणातील पाण्याची आवक ८५ हजार क्युसेकवर होती. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढतच चालली होती. त्यामुळे २६ जुलैला सकाळी सात वाजता धरणातून पाणी सोडण्याच्या क्षमतेते वाढ करुन आणखी १० हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर चार दिवस ३० हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यानंतर धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने ३० जुलैला ४० हजार क्युसेक विसर्ग सुरु करण्यात आला. त्यानंतर तो विसर्ग तीन दिवस स्थिर होता. त्यानंतर पावसाचा जोर वाढल्याने एक ऑगस्टला पुन्हा ५० हजार विसर्ग सुरु करण्यात आला. त्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होवून पुराचा धोका निर्माण झाला होता.