कोयना धरणातून 40 हजार क्युसेक्स विसर्ग वाढवला, धरणातील पाणीपातळीचा पहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवाधार पाऊस झाला. पश्चिमेकडील कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी आदी प्रमुख धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला. कोयना धरणात एकूण ८५.३७ टीएमसी पाणीसाठा झाला असून पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सांडव्यावरील विसर्गात वाढ करून ४० हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे.

कोयना धरणाचा सांडव्यावरून ४०,००० आणि पायथा विद्युत गृहामधील २,१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग ४२,१०० क्युसेक्स झाला आहे. कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०७ तर नवजाला ९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३ हजार ५८३, नवजा येथे ४ हजार १५४ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर महाबळेश्वरला आतापर्यंत ३ हजार ९१३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्यातच सकाळच्या सुमारास कोयनेत ३५ हजार ४०१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण पाणीसाठाही ८५.३७ टीएमसी झाला होता. तर ८१.११ टक्के धरण भरले आहे.