पाटण प्रतिनिधी | कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असून मागील चोवीस तासात विक्रमी ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, आज देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीवर जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचं धुमशान
जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या पावसाचं धुमशान सुरू आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दमदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळी धरणातील पाणीसाठा ४० टीएमसी झाला आहे.
चोवीस तासात विक्रमी पावसाची नोंद
कोयना धरण क्षेत्रात मागील चोवीस तासात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. कोयनानगरला १८७ मिलीमीटर, महाबळेश्र्वरमध्ये ९९ मिलीमीटर तर नवजा येथे सर्वाधिक २७४ मिलीमीटर पाऊस झालाय. मुसळधार पावसामुळे धरणात प्रतिसेकंद ४८ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे चोवीस तासात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ४.५० टीएमसीने वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने रविवारी सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट दिला होता, तर सोमवारी देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रालय नियंत्रण कक्षाने नागरीकांना सावधानता बाळगण्याचं सुचित केलं आहे. संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पावसाची संततधार कायम राहिल्यास नद्यांचे पाणी इशारा पातळीवर जाऊ शकते.