सातारा प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जवळपास ऐंशी लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना खंडाळा पोलिसांनी मुंबई, मनमाड, संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी भीमसेन भालेराव, चित्रसेन भालेराव, मयूर व्यवहारे, जैन राहुल पालवे या सर्व संशयिताना न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खंडाळा येथील शिक्षक कुटुंबीयांकडून शेअर मार्केटमध्ये परताव्याचे अमिष दाखवत 79 लाख 70 हजार रुपये उकळल्याबाबतची तक्रार दाखल झाली होती.
यावर सखोल तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याद्वारे खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके यांना दिली होती. खंडाळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कौशल्यपूर्ण तपास करत सर्व संशयितांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेत संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला आहे.
या 80 लाखांच्या अपरापैकी 32 लाख 50 हजार 500 रुपयांचा परतावा कंपनीद्वारे देऊन उर्वरित 47 लाख 19 हजार 500 रुपये देण्यास टाळाटाळ करत असल्याने अक्षय वायदंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी अपहारातील सर्वांचेही मोबाईल बंद असल्याने तपासात अनेक अडचणी येत होत्या. यावर खंडाळा पोलीस ठाण्याचे तपास पथक गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध मोहिमेवर गेले.
मयूर गंगाधर व्यवहारे (जैन) व राहुल भाऊसाहेब पालवे यांना संभाजीनगर येथून ताब्यात घेत विचारपूस केली असता या प्रकरणातील मुख्य आरोपी मनमाड ( जि.नाशिक ) येथे असल्याचे कळले तसेच साधना पाहूले या महिलेला नवी मुंबई या ठिकाणाहून खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मुख्य आरोपी भीमसेन सुनील भालेराव व त्यांच्या सोबतीस असलेले नेहा भालेराव, चित्रसेन भालेराव हे मनमाड या ठिकाणी आढळून आले.
या कौशल्यपूर्ण तपासाबाबत सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उप अधीक्षक राहुल धस यांनी पोलीस निरीक्षक सुनील शेळके व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस फौजदार राजू अहिरराव, पोलीस अंमलदार शरद तांबे, अमित चव्हाण, नितीन महांगरे, लता पाडवी, शीतल जाधव, भारती तळपे यांनी सहभाग घेतला.