पळशी गावाच्या हद्दीतून 12 लाखांच्या वराह चोरी प्रकरणी 4 जणांना अटक; शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0
7

सातारा प्रतिनिधी | खंडाळा तालुक्यातील पळशी गावच्या हद्दीत असणाऱ्या वराहपालन असलेल्या शेडमध्ये साधारण ११ ते १२ जण घुसत कामगार व तिच्या मुलीला मारहाण करीत साधारण बारा लाखांचे १८३ पांढरे वराह चोरून नेल्याप्रकरणी शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी चौघांना अटक केली असून, इतर चोरट्यांचा शिरवळ पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेमुळे पळशी परिसरात खळबळ उडाली आहे.

शिरवळ, ता. खंडाळा येथील दत्तात्रय शंकर माने यांचे पळशी गावच्या हद्दीत असणाऱ्या महारकी शिवारात वराह पालन व्यवसाय आहे. शुक्रवार, दि. ३ रोजीच्या मध्यरात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान साधारणपणे १२ जणांनी अचानकपणे येऊन या ठिकाणी असलेले कामगार भरत वाघे व त्यांच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शेडमधील १८३ वराह वाहनामध्ये भरून घेऊन गेल्याची माहिती कामगार भरत वाघे याने मालक दत्तात्रय माने यांना दिली. त्यानुसार दत्तात्रय माने यांनी शिरवळ पोलिस ठाण्यात धाव घेतली.

यावेळी दत्तात्रय माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरवळ येथील प्रकाश अशोक जाधव, मयूर अशोक जाधव, सोन्या संजय पवार (सर्व रा. शिरवळ, ता. खंडाळा), सचिन ऊर्फ बाळा तुकाराम जाधव (रा. वीर, जि. पुणे) यांच्यासह अन्य सात ते आठ अज्ञातांविरुद्ध शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने प्रकाश जाधव, मयूर जाधव, सोन्या पवार, सचिन ऊर्फ बाळा जाधव यांना अटककेली.

त्यानंतर संबंधितांना खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सोमवार, दि. १३ जानेवारीपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली असून, या घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महादेव शिंदे हे करीत आहेत.