साताऱ्यात दहशत निर्माण करणाऱ्या ‘एके’ गँगला दणका; सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी तडीपार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील ४ सदस्यांना महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार केले आहे. नोव्हेंबर २०२२ पासून आत्तापर्यंत १०५ गुन्हेगारांना तडीपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

आतीश ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक आणि संजय विजय कोळी अशी टोळीतील गुन्हेगारांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आतीश ऊर्फ बाबू राजेंद्र कांबळे, विशाल शेखर वाडेकर, रामा दादा मंडलिक आणि संजय विजय कोळी यांचा समावेश असलेली ही टोळी शिरवळ परिसरात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी चोरी, गंभीर दुखापत पोहोचवून शिवीगाळ दमदाटी करणे असे गंभीर गुन्हे करीत होती. या टोळीमुळे शिरवळ तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होत होता.

या अनुषंगाने शिरवळ पोलीस ठाण्याने या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे पूर्ण सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केला होता. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी या प्रस्तावाची चौकशी करून या टोळीतील 4 सदस्यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचा आदेश दिला आहे.

हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्रेणी पो.उ.नि. तानाजी माने पो. हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, शिरवळ पोलीस ठाण्याचे पो. हवालदार सचिन वीर आणि पो. कॉं मंगेश मोझर यांनी योग्य पुरावा सादर केला आहे. तर सदरील प्रस्ताव तत्कालीन पोलीस निरीक्षक नवनाथ मदने यांनी पाठवत विद्यमान पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी पाठपुरावा केला आहे.