कराड प्रतिनिधी । भरदिवसा बिबट्याने केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळ्या जागीच ठार झाल्याची घटना कराड तालुक्यातील सुपने गावातीळ पवारमळा येथे मंगळवारी घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या दोन ते दिवसापासून सुपने परिसरातील शेत शिवारात बिबट्याचा वावर हा वाढला असल्याची चर्चा होती. गावातील व परिसरातील मळ्यातील शेतकऱ्यांना बिबट्या दृष्टीस पडला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सुपने गावातील पवारमळा शिवारात असलेल्या राजेंद्र साहेबराव पवार यांच्या गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये चार शेळ्या मृत्युमुखी पडल्या.
यावेळी शेडच्या लागत असलेल्या दुसर्या गोठ्यात वैशाली पवार या महिला शेतकरी होत्या. त्यांनी शेळ्यांवर हल्ला झाल्याने शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकला. आवाज ऐकल्याने त्यांनी शेडच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करून धूम ठोकली. त्यानंतर त्यांनी याची माहिती राजेंद्र पवार यांना दिली.
बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यात 4 शेळी ठार ; कराड तालुक्यातील सुपनेतील पवार मळ्यातील घटना pic.twitter.com/3wFRMlm1jK
— santosh gurav (@santosh29590931) June 13, 2023
यानंतर त्या ठिकाणी पोलिस पाटील कमलेश कोळी, राजेंद्र पवार व इतर शेतकरी आले. त्यांनी पाहिले असता बिबट्याच्या हल्ल्यामुळे चार शेळ्या मृत्युमुखी पडल्याचे त्यांना दिसून आले. या घटनेनंतर शेतकऱयांनी बिबट्याच्या हल्ल्याची माहिती कराडचे वन अधिकारी कुंभार यांना दिली. कुंभार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वनविभागाचे अमोल महाडिक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच शेळ्या मृत्यू पावलेल्या घटनेचा त्यांनी पंचनामा केला.