पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्याची मागणी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून वाढल्याने आज कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला. सकाळी 11 वाजता धरणातून 1 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ज्यामुळे एकूण 3100 क्यूसेक पाणी कोयना नदी पात्रातून सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी सोडले जात आहे.
कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे आणि या धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती तसेच सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठीही अवलंबून आहे. सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाण्याची मागणी असते, त्यामुळे या वर्षीही त्यांच्या मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
मागील दोन महिन्यांपासून कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्यूसेक पाणी विसर्ग केला जात होता, त्यात आता 1000 क्यूसेक पाणी वाढवण्यात आले आहे. हे पाणी कोयना नदीपात्राद्वारे सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पुरवण्यात येत आहे.