कराड प्रतिनिधी | जंगली हिंस्र प्राण्याच्या नख्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले असून त्याचा साथीदार पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. शहरातील शनिवार पेठेत सागर लॉजनजीक असलेल्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवर रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने आरोपीकडून ३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
श्रीकृष्ण उर्फ गोट्या शंकर कलढोणे (वय-२४), रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर त्याचा साथीदार सुदर्शन यादव (रा. विश्रामबाग, सांगली) हा पसार झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील शनिवार पेठेत सागर लॉजनजीक असलेल्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवर टक्कल असलेले दोन संशयित राहत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह पथकाने रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास इमारतीच्या टेरेसवर छापा टाकला.
त्यावेळी पोलिसांना पाहताच दोन्ही संशयित पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यापैकी श्रीकृष्ण उर्फ गोट्या कलढोणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर सुदर्शन यादव हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. पोलिसांनी श्रीकृष्ण कलढोणे याची झडती घेतली असता त्याच्याकडे तीस लाख रुपये किमतीच्या जंगली हिस्त्र प्राण्याच्या टोकदार दोन नख्या, २ हजार ६०० रुपयांची रोकड आणि एक कोयता आढळून आला.