सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्याची मंगळवारी शेवटची मुदत होती. या योजनेसाठी अंतिम मुदतीअखेर जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या ८ लाख ३ हजार ८०७ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत विविध तांत्रिक कारणांनी ३ हजार ६९६ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
राज्यभरात मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसाठी अर्ज भरण्यास जून महिन्यापासून सुरुवात झाली.यावेळी दाखल झालेल्या अर्जाची तांत्रिक अडचणींची तपासणी करण्याचे काम अंगणवाडी सेविकांकडून करून घेतले जात होते. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दीड हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेत पात्र लाभार्थ्यांना सहभागी होण्यासाठी १५ ऑक्टोबर ही शेवटची मुदत देण्यात आली होती.
त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत आठ लाखांवर महिला पात्र ठरल्या आहेत. दरम्यान, या योजनेत अंतिम मुदतीअखेर जिल्ह्यात पात्र महिलांची संख्या आता आठ लाख तीन हजार ८०७ वर पोचली आहे. लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे लाभ मिळू शकला नव्हता. त्यानंतर आधारशी लिंकअप नसणाऱ्यांनी बँकेत जाऊन आधार लिंकअप करण्याचे आवाहन केले होते.