कराड प्रतिनिधी | कागद जाळल्याच्या कारणावरून पती- पत्नीला तिघांनी मारहाण केल्याची घटना मलकापूर-आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत प्रदीप पांडुरंग पवार (रा. चचेगाव, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सर्फराज कोरबू, अकील कोरबू, युनूस कोरबू (तिघेही रा. गोळेश्वर, ता. कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चचेगाव येथील प्रदीप पवार, तसेच गोळेश्वर येथील सर्फराज कोरबू यांचे आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत एकमेकांशेजारी दुकान आहे. सोमवारी दुपारी प्रदीप पवार हे दुकानानजीक असलेल्या भिंतीलगत खराब कागद जाळत होते.
त्यावेळी सर्फराज कोरबू याने तू याठिकाणी कागद जाळायचे नाहीस. ही तुझी जागा नाही, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी केली. प्रदीप यांच्या पत्नी वैशाली या भांडणे सोडविण्यासाठी आल्या असताना संशयित सर्फराज याच्यासह अकिल कोरबू, युनूस कोरबू या तिघांनी प्रदीप व त्यांच्या पत्नी वैशाली यांना मारहाण केली. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मारहाण झालेल्या महिलेला न्याय मिळावा, यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी दि. १४ कराड बंदची हाक दिली होती. याबाबत मंगळवारी दुपारी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांशी पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी चर्चा केली. या गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली असल्याचे उपाधीक्षक ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात आला आहे.