कराड प्रतिनिधी | विरोधात तक्रार केल्याच्या कारणावरून मुंढे, ता. कराड गावच्या हद्दीत सतनाम एजन्सीचे मॅनेजर निखिल बलराम पोपटानी (वय 35, रा. मलकापूर) यांच्या डोक्यात कोयत्याने वार आणि हॉकी स्टिक, दांडक्याने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सात जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यातील ३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
उमेश चंदवानी, अनिल चंदवानी (रा. लाहोटीनगर, मलकापूर), अण्णा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही), रितेश घारे, सूरज पाटील (रा. बाबरमाची, ता. कराड), कपिल लोंढे (रा. खोडशी, ता. कराड) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. रितेश घारे, सूरज पाटील व कपिल लोंढे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निखिल पोपटानी हे मुंढे येथील सतनाम एजन्सीचे व्यवस्थापक असून, अनिल गोपीचंद बसंतानी यांचे न्यायालयीन कामकाजही ते पाहतात. मुंढे येथील जमीनीच्या मालकी हक्कावरून बसंतानी यांचा उमेश चंदवानी, अनिल चंदवानी यांच्याशी न्यायालयात दावा सुरू आहे. निखील पोपटानी हे त्यांचे दैनंदिन कामकाज करत असताना, संबंधित जागेवर उमेश चंदवानी व अन्य लोक जमल्याची माहिती एकाने त्यांना दिली. त्यामुळे पोपटानी हे एजन्सीची तीन लाख 82 हजारांची रोकट असलेली बॅग घेऊन कराडकडे जाता जाता मुंढे येथील जागेवर गेले. त्यावेळी उमेश चंदवानी व अन्य संशयितांनी त्यांच्याकडे पाहून, पकडा, पकडा असा आहे आरडाओरडा केला. त्यामुळे पोपटानी हे घाबरून गाडी घेऊन निघून गेले.
उमेश, अनिल चंदवानी व अण्णा यांनी पोपटानी यांचा कारमधून पाठलाग केला. विमानतळापुढे एका पेट्रोलपंपानजीक तिघांनी गाडी आडवी मारून पोपटानी यांना थांबवले. त्यावेळी उमेश चंदवानी याने, तू आमच्या विरोधात तक्रार करतोस, तुला व तुझ्या अनिलशेठला ठेवत नाही, असे म्हणत पोपटानी यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. अनिल चंदवानी व अण्णा यांनी हॉकी स्टिक व दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर दुसर्या गाडीतून आलेल्या चौघांनी पोपटानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. संशयितांनी पोपटानी यांच्या हाताच्या बोटातून पावणेदोन तोळ्याची सोन्याची अंगठी, मोबाइल आणि बॅगेतील रोकड मिळून चार लाख 61 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गुरुवारी दि. 11 रोजी दुपारी 1.45 च्या सुमारास ही घटना घडली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत.