पाटणला 3 लाख 9 हजार 993 मतदार ठरविणार 11 उमेदवारांचे भवितव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | २६१ पाटण विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. ४२४ मतदान केंद्रांसाठी एकूण १ हजार ६९६ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. १३१ जीप व ५० एसटी बस असे एकूण १८१ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. २० रोजी पार पडणाऱ्या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोम्पे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनंत गुरव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.

सोपान टोम्पे म्हणाले, पाटण विधानसभा मतदारसंघात एकूण ४२४ मतदान केंद्रे आहेत. २० रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १५४-पाटण व ३६०-विहे मतदान केंद्र, १५०-पाटण, २११-कवठेकरवाडी येथे युवा मतदान केंद्र, २८०-चाफळ आदर्श (सांस्कृतिक वारसा) मतदान केंद्र, १४५-कोंजवडे दिव्यांग मतदान केंद्र, १४०-तारळे भटके विमुक्त मतदान केंद्र, ३८-काडोली पडदानशील मतदान केंद्र, १६- गोकुळ तर्फ हेळवाक महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना व २४-रासाटी माझा सह्याद्री माझा अभियान अशा विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.

पाटण विधानसभा मतदारसंघात संपर्क होत नसलेल्या मतदान केंद्रांवर मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलिस विभागामार्फत वायरलेस यंत्रणादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व नियोजन झाले असून, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दि. २० रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकांना मतदान साहित्य वाटप करणे, मतदानानंतर स्वीकारणे यासाठी पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयाच्या मैदानावर मंडप व्यवस्थापन करून नियोजन केले आहे.

दरम्यान, दि. १९ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ४२४ मतदान केंद्रांवर नियुक्त केलेल्या मतदान पथकांना मतदान साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. ४२४ केंद्रांवर प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, २ व ३ असे १ हजार २७२ एकूण १ हजार ६९६ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मतदान यंत्रे व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोच विण्यासाठी १३१ जीप व ५० एसटी बसची सोय करण्यात आली आहे.

याशिवाय पाटण मतदारसंघातून बाहेरच्या मतदारसंघात येणाऱ्या व जाणाऱ्या कर्मचारी यांच्यासाठी १३ एसटी बसेसची सोय पाटण बसस्थानकातून करण्यात आली आहे. यासोबत पोलिस अधिकारी व कर्मचारीही असणार आहेत. या मतदान प्रक्रियेत सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी, असे आवाहनही सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनंत गुरव यांनी केले.

१८ टेबलवर मतमोजणी

पाटण येथील शासकीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह येथे दि. २३ रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण १८ टेबलवर २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. पाटण विधानसभा मतदारसंघात १ लाख ५६ हजार ७९२ पुरुष मतदार आणि १ लाख ५३ हजार १६८ महिला मतदार, ३ इतर असे एकूण ३ लाख ९ हजार ९९३ मतदार हे ११ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.