सातारा प्रतिनिधी । राज्य शासनाकडून शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक योजना आणि उपक्रम राबविले जात आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील शेतीच्या तंत्रज्ञानाची माहिती तसेच तेथे शेती कशी केली जाते, अवजारे कोणती आणि त्याचा कसा वापर केला जातो, याची माहिती होण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने परदेश अभ्यास दौरा नियोजित केला असून यासाठी सातारा जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदानही दिले जाते. यातून शेतकऱ्यांना मोठी मदत होत असते तसेच शासनाकडून शेतकऱ्यांसाठी शेती अभ्यास दौराही आयोजित केला जातो. शेतकऱ्यांना परदेशातील तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तेथील शेती कशी केली जाते?, उत्पादनही कसे घेण्यात येते? त्यासाठी सिंचन आणि यंत्रे कोणती वापरली जातात? याची माहिती होण्यासाठी अभ्यासदौरा देखील आयोजित केला जातो. अशाच अभ्यास दौरा सध्या आयोजित केला असून तो महत्त्वाचा ठरणार आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील तीन शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयात ही निवड झाली. दरवर्षी शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. यामध्ये शेतकऱ्यांना योजनांची माहितीही दिली जाते.
जिल्ह्यातील ‘या’ 3 शेतकऱ्यांना लागली लॉटरी
अभ्यास दौऱ्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील तीन शेतकऱ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात आली आहे. यामध्ये विक्रम काशीनाथ साळुंखे (रा. नागठाणे ता. सातारा), जगदीश शिवाजीराव कदम (रा. गिरवी, ता. फलटण) , निलेश हनमंत पवार (रा. खंडाळा) या शेतकऱ्याचा समावेश आहे.
नेमका किती येणार खर्च?
राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्यास परदेशात जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासन ५० टक्के खर्च करणार आहे. उर्वरित खर्च हा शेतकऱ्यांना स्वतःच करावा लागणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त एक लाख रुपये किंवा खर्चाच्या ५० टक्के रक्कम यापैकी कमी असणारी रक्कम शेतकऱ्यांना खर्चा अंतर्गत मिळणार आहे.
कोण-कोणत्या देशात जाणार?
कृषी विभागाच्या वतीने नुकताच शेतकऱ्यांचा परदेश शेती अभ्यास दौरा नियोजित केला आहे. यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्पेन, फ्रान्स, न्यूझिलंड, व्हिएतनाम, मलेशिया, नेदरलंड आदी देशापैकी कोठेही शेतकऱ्यांना जाता येणार आहे.