पाटण प्रतिनिधी | कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरात आज बुधवारी सकाळी 6.48 वाजता 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची सौम्य लक्षणे भूकंपाच्या केंद्र बिंदूपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटण तालुक्याला जाणवली.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 5 किलोमीटर खोल होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. दरम्यान, चांदोली धरणावर या भूकंपाचा कोणताही परिणाम जाणवलेला नाही.
तसेच दुसरीकडे कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असले तरी कोयना धरण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. चांदोली धरणाजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. 29 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.