सातारा प्रतिनिधी । जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन चोरी करणाऱ्या पोलीस अभिलेखावरील आरोपींकडून १ दरोडा, २३ जबरी चोरी, १ घरफोडी व १ चोरी असे एकुण २६ गुन्हे उघड करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. सुमारे ३९ लाख ९ हजार ६०० रुपये किंमतीचे अर्थाकिलो पेक्षा अधिक ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करून चोरट्याना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
शेख सुरेश भोसले (रा. खामगांव ता. फलटण जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केलेल्या कारवाईबाबत आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांची उपस्थिती होती. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऑक्टोबर २०२३ मध्ये मालगांव येथे शेतातील घरावर अज्ञात इसमांनी जबरी दरोडा टाकुन वयोवृध्द पती पत्नीस जबर मारहाण केलेबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्याकडे उघड करणेकरीता वर्ग करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा तपास सपोनि सुधीर पाटील हे करीत होते. तसेच लोणंद पोलीस ठाणे हद्दीत जून २०२४ मध्ये दोन महिलांना जबर मारहाण करुन जबरी चोरी केले बाबत गुन्हा नोंद झाला आहे. सदरचा गुन्हा व मालगांव येथील दरोडयाचा गुन्हा पोलीस अभिलेखावरील आरोपी शेख सुरेश भोसले याने त्याच्या साथीदारांसह केले असून तो फलटण भागात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे त्यांनी सदर आरोपी यास ताब्यात घेवून कारवाई करणेबाबत सपोनि सुधीर पाटील व त्यांच्या पथकास सूचना दिलेल्या आहेत.
त्याप्रमाणे सुधीर पाटील सपोनि व त्यांच्या पथकाने फलटण भागात वेळोवेळी सापळा लावून अहोरात्र संशईत आरोपीवर पाळत ठेवून आरोपी शेख सुरेश भोसले व एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना फलटण भागातून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे त्यांनी सातारा जिल्हयामध्ये जेष्ठ नागरिक व महिला यांच्यावर हल्ले करुन एक दरोड, तेवीस जबरी चोरी, एक घरफोडी व एक चोरी असे एकुण २६ गुन्हे केले असल्याचे निष्पन्न केले. सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ५४ तोळे ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चालू बाजार भावाप्रमाणे ३९ लाख ९ हजार ६०० रुपये किंमतीचे दागिने हस्तगत केले आहेत. तसेच सदर आरोपी यांच्याकडून चोरीचे सोने विक्री करीता घेणार एक इसम निष्पन्न करण्यात आला असून तो फरारी आहे.
सदर कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, अमित पाटील, तानाजी माने पोलीस अंमलदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, साबीर मुल्ला, मुनीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, सनी आवटे, हसन तडवी, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, मनोज जाधव, राजु कांबळे, अजय जाधव, अमित झेंडे, धीरज महाडीक, मोहसीन मोमीन, वैभव सावंत, पंकज बेसके, अमृत कर्पे, संभाजी साळुंखे, दलजित जगदाळे, विजय निकम, यांनी सहभाग घेतला. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल यांनी अभिनंदन केले आहे.
311 गुन्हे उघड; 5 कोटी 4 लाख 96 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
नोव्हेंबर २०२२ पासून स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, इतर चोरी असे एकूण ३११ गुन्हे उघड करुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिण्यापैकी ७२०.५ तोळे (७ किलो २०५ ग्रॅम) वजनाचे ५,०४,९६,५००/- (पाच कोटी चार लाख शहात्रव हजार पाचशे रुपये) किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.