कराड प्रतिनिधी । कराड आणि पाटण तालुक्यात बिबट्यांचे हल्ले करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. आतापर्यंत शेकडो पाळीव जनावरांचा त्यांनी फडशा पाडला आहे. तर काही ग्रामस्थांवरही यापूर्वी हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. पाळीव जनावरांची बिबट्याने शिकार केल्यास संबंधित शेतकऱ्याला वन विभागाकडून भरपाई देण्यात येतेच. मात्र, आता बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाला देण्यात येणाऱ्या भरपाई रक्कमेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जनावरांवरील बिबट्याच्या हल्ल्याची २४९ प्रकरणे कराड वन कार्यालयाकडे प्राप्त झाली. त्यामध्ये ५४ लाख ९२ हजार ९४० एवढी नुकसान भरपाई वन विभागाकडून देण्यात आली आहे.
कराडच्या वनक्षेत्रालगत तसेच गावांच्या शिवारात बिनदिक्कतपणे बिबट्या वावरत आहेत. त्यांच्याकडून मानवी वस्तीसह इतर ठिकाणी बांधलेली पाळीव जनावरे फस्त केली जात असून तालुक्यात शेकडो जनावरे बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. तीन वर्षांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एका मुलाचा मृत्यूही झाला होता. जनावरांचा मृत्यू झाल्यास वन विभागाकडून संबंधित शेतकऱ्याला भरपाईची रक्कम दिली जाते. त्याबरोबरच मनुष्याचा मृत्यू झाल्यास २५ लाख भरपाई दिली जाणार आहे.
डोंगरी भागात बिबट्याचे सर्वाधिक हल्ले
कराड तालुक्यातील ओंड, उंडाळे, तुळसण, आगाशिवनगर, डेळेवाडी, तांबवे, सुपने या परिसरात बिबट्याचे जास्त हल्ले होत आहेत. डोंगरी भागातही हल्ल्यांचे प्रमाण जास्त आहे.
जखमी, अपंगत्व आल्यास मदत मिळते का?
वन्यप्राण्याच्या ही हल्ल्यात जखमी झाल्यास औषधो पचारासाठी आर्थिक मदत दिली जाते. मात्र, त्यासाठीही काही नियम असून प्रती व्यक्ती ५० हजार एवढी मर्यादा आहे.
7 महिन्यांत शेकडो जनावरांवर हल्ले
कराड तालुक्यात एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यात सुमारे साडेपाचशे जनावरांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार केले आहे.
20 ऐवजी आता 25 लाख मिळणार
बिबट्याच्या हल्ल्यात मनुष्याचा मृत्यू झाल्यास पूर्वी २० लाख रुपये भरपाई कुटुंबाला दिली जात होती. मात्र, आता त्यामध्ये वाढ करून भरपाई रक्कम २५ लाख रुपये करण्यात आली आहे.
वारसदाराला धनादेश अन् खात्यावर एफडी
मदतीची रक्कम देताना १० लाख रुपये धनादेशाद्वारे इतर रक्कम मुदत ठेव स्वरूपात मृताच्या वारसाला दिली जाते.
हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल
बिबट्याचा हल्ला झाल्यानंतर १९२६ या वन विभागाच्या हेल्पलाइनवर संपर्क साधता येतो. त्यानंतर तातडीने मदत उपलब्ध होते.
या प्राण्यांकडून हल्ला झाल्यास मिळते मदत
बिबट्या, वाघ, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, माकड, नीलगाय, खोकड या प्राण्यांकडून मानवी हल्ला झाल्यास शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते.