पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत सन २०२३- २४ व २०२४- २५ या आर्थिक वर्षात एकूण २३ प्रस्ताव मंजूर झाले आहेत. प्रत्येकी दोन लाख रुपयांप्रमाणे एकूण ४६ लाख रुपये अनुदानाचा लाभ संबंधित मृताच्या कुटुंबीयांना देण्यात आलेला आहे.
पाटण तालुक्यात गत व चालू आर्थिक वर्षात रस्ते अपघात, पाण्यात बुडून, विजेच्या धक्क्याने, जंगली प्राण्यांच्या हल्ल्यासारख्या विविध घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्य वारसांना शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत २३ कुटुंबांना ४६ लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे.
सन २०२३-२४ या वर्षात एकूण १६ प्रस्ताव आले होते. त्यापैकी १२ प्रस्ताव मंजूर होऊन अनुदान वारसांच्या थेट खात्यावर जमा करण्यात आले आहे. तर त्रुटींमुळे प्रलंबित असलेल्या व नंतर कागदपत्रांची पूर्तता झालेल्या चार प्रस्तावांचे अनुदान आठवड्यात जमा होईल. सन २०२४ या वर्षात नऊ प्रस्ताव आले असून, त्यापैकी सात प्रस्तावांना तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे, तर त्रुटींमुळे दोन प्रस्ताव नामंजूर झाले आहेत. मंजूर प्रस्तावांच्या निधीसाठी शासनाकडे मागणी केली आहे. सन २०२४-२५ या वर्षात मंजूर झालेल्या सात कुटुंबांना एकूण १४ लाख रुपये अनुदान अदा करण्यात येत आहे.