पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरला; कोयना धरण भरण्यासाठी ‘इतक्या’ TMC ची गरज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर ओसरल्याने कोयना धरणातील पाण्याची आवक बंद झाली आहे. गेल्या चोवीस तासात कोयनानगरमध्ये 24, नवजामध्ये 30 आणि महाबळेश्वरमध्ये 19 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सध्या धरणात 83.94 इतका समाधानकारक पाणीसाठा आहे. मात्र, धरण भरण्यासाठी अजून 21 टीएमसी पाण्याची गरज आहे.

वास्तविक कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी इतकी आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याने 80 टीएमसीचा टप्पा ओलांडला. मात्र, आता पावसाचा जोर ओसरला असून तुरळक स्वरूपात पाऊस कोसळत आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे धरणातील पाण्याची आवकही थांबली आहे.

सातारा जिल्ह्यातील पूर्व भागात कराड उत्तर, माण, खटाव, खंडाळा, फलटणसह कोरेगाव तालुक्यातील भागात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पावसाअभावी अनेक भागात पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई निर्माण झाली आहे. ऐन पावसाळ्यात टँकरने पिण्याचे पाणी पुरवावे लागत आहे. दुष्काळी माण, खटाव तालुक्यात जनावरांच्या चार्‍याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.

खटाव-माणला दुष्काळी तालूका जाहीर करा : शेतकऱ्यांची मागणी

सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्याकडे पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे येथील शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पावसाअभावी खरीप पिकांची उगवण झालेली नाही. तर पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही तालुक्यात चारा छावण्या सुरू कराव्यात, दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.