सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याला यंदा वादळी पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलया पिकांचे नुकसान तर झालेच आहे. शिवाय शेतकऱ्यांची घरांची, जनावरांच्या शेडची अनेक ठिकाणी पडझड देखील झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान हे पाटण तालुक्यात झाले आहे. वाई, सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे २०७ घरांची पडझड झाली. तर १३ जनावरेही मृत झाली आहेत. यामुळे बळीराजाचेही नुकसान झाले आहे. सध्या अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होते. तसेच भूस्खलन होऊन गावांना धोका निर्माण होतो. मागील आठवड्यात पश्चिम भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तसेच रस्ते खचले, भूस्खलन झाले. त्यामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याची वेळ आली. या अतिवृष्टीचा फटका पाटण, महाबळेश्वर, वाई, आणि सातारा तालुक्याला अधिक करुन बसला.
मागील आठवड्यातील अतिवृष्टीत पश्चिम भागातील २०७ घरांना फटका बसला. यामध्ये पाटण तालुक्यातच अधिक नुकसान झाले आहे. या तालुक्यात १३५ घरांना दणका बसला. तर सातारा तालुक्यात ४९ घरांचे नुकसान झाले. वाई तालुक्यात १४ तर महाबळेश्वर तालुक्यातही ९ घरांना फटका बसलेला आहे. त्याचबरोबर काही भागात शेतीचेही नुकसान झाले आहे.