कराड प्रतिनिधी | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलन करत सरकारला झुकायला लावले. त्यांच्या आंदोलनानंतर प्रत्येक जिल्ह्यात कुणबीच्या नोंदींचा शोध घेण्याचे काम शासनाने हाती घेतलेले आहे. तालुकास्तरावर नेमलेल्या समितीकडून या कुणबीच्या नोंदींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात तब्बल २० हजार २ कुणबी नोंदी सापडल्या असून सर्वाधिक नोंदी पाटण व सातारा तालुक्यात आहेत. आतापर्यंत 4 लाख 59 हजार कागदपत्रांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
कुणबी नोंदी शोधासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील व प्रांत कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून सर्व तहसील कार्यालयांसह १२ विभागांकडील नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन दिवसांपासून ही कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. कुणबीच्या सर्वाधिक नोंदी या महसूलकडेच आहेत. त्यामुळे तलाठी, कोतवाल, अन्य कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, ऑपरेटर यासह शिक्षण विभाग, पोलिस अधिकारी, कर्मचारी, पालिकांचे कर्मचारी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत.
सर्व विभागांनी मिळून आतापर्यंत चार लाख ५९ हजार दस्तावेजांची तपासणी केली. यामध्ये बहुतांशी दस्तावेज हे मोडी लिपीतील आहेत. त्यातून कुणबीच्या २० हजार दोन नोंदी सर्व अकरा तालुक्यांत मिळून सापडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक नोंदी या पाटण तालुक्यात असून, येथे १४ हजार नोंदी सापडल्या आहेत. तर सर्वात कमी नोंदी माण तालुक्यात असून, येथे आतापर्यंत केवळ ९ नोंदी सापडल्या आहेत.
तालुकानिहाय दस्तावेजांची तपासणी व कंसात सापडलेल्या कुणबीच्या नोंदी
१) सातारा : ५० हजार (१८००),
२) माण १३ हजार ५०० (नऊ),
३) खटाव १२ हजार ५०० (२०८),
४) जावळी ५६ हजार (७६०),
५) कराड : १७ हजार आणि (५१),
६) पाटण ३६ हजार (१४ हजार),
७) कोरेगाव एक लाख दोन हजार (१०३२),
८) महाबळेश्वर ८५०० (११००),
९) खंडाळा ७० हजार (८५४),
१०) वाई ८५ हजार (१७०), फलटण ८५०० (१८). ११) एकूण तपासलेले दस्तावेज चार लाख ५९ हजार (२० हजार दोन).