कराड प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कराड-चिपळून मार्गावर आज धडक कारवाई केली. या कारवाईत पथकाने उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील गोषटवाडी हद्दीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्यासह सहा चाकी व चारचाकी वाहने, असा 19 लाख 75 हजार 400 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे पाटण तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड व पाटण तालुका परिसरात गोवा बनावट दारुचा पुरवठा करणारे सदर गुन्हयातील व्यक्ती गोरखनाथ बाबुराव पवार रा.बेलवाडे खुर्द ता.पाटण, प्रदीप कृष्णात सलते रा.मु.सलते पो. बीबी ता.पाटण व दिनेश दगडू कदम रा.वालोपे ता.चिपळूण जि.रत्नागिरी यांच्या विरुदध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65(अ)(इ),81,83,90,103 व 108 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क मंत्री देसाईंच्या तालुक्यातच सापडला 20 लाखांचा विदेशी मद्यसाठा
उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची कारवाई; 3 जणांना अटक pic.twitter.com/miu8Qt0dDi
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) October 12, 2023
या कारवाईमध्ये एकूण 25 बॉक्स गोवा बनावट दारु, एक सकस दुधाचे सहाचाकी वाहन, सकस दुधाची 553 कॅरेट तसेच एक चारचाकी वाहन असा एकूण रुपये 19 लाख 75 हजार 400 किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन 3 आरोपीं विरुदध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत निरीक्षक माधव चव्हाण, दुय्यम निरीक्षक किशोर नडे, प्रशांत नागरगोजे, विनोद बनसोडे व महिला जवान राणी काळोखे, मनिष माने, आबासाहेब जानकर, राजेंद्र आवघडे यांनी सहभाग घेतला.
सातारा जिल्हयामध्ये बनावट दारु तसेच हातभट्टी दारु, गोवा बनावट दारु, तसेच इतर कोणत्याही प्रकारची बनावट निर्मिती, विक्री, वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची माहिती तात्काळ या कार्यालयास देण्यात यावी असे आवाहनही श्रीमती शेडगे यांनी केले आहे.