कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी तालुका कराड गावच्या हद्दीत स्कूटी दूचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चालकाने दारुच्या नशेत भीषण धडक दिली. या भीषण धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या तर अठरा वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे. सदरचा अपघात रविवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला.
रुक्मिणी परदेसी (36) व आर्या परदेसी (11) अशी मायलेकींची नावे आहेत. गायत्री परदेसी (18) ही गंभीर जखमी आहे. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सातारा हून कराड दिशेकडे निघालेली दूचाकी क्रमांक एम.एच.०४- सीक्यू- ७९४० ला पाठीमागून आलेल्या वाहनाने जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत मोटरसायकल वरील ट्रीपल सीट असणाऱ्या दोन महिला जागीच ठार झाल्या तर गायत्री संतोष परदेसी वय १८ रा.कराड ही युवती जखमी झाली आहे. अपघातातील मृत दोन्ही महिला कराड येथील असल्याचे समजते. सदर महिलांची रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नाही.
अपघातानंतर घटनास्थळावरून वाहनाने पोबारा केला. महामार्गावर काळ वाहतूक ठप्प झाली होती.