कराड प्रतिनिधी | भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून कराड येथील व्यावसायिक सूरज विष्णू साळुंखे (रा. मंगळवार पेठ) यांना तब्बल 90 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नवीनकुमार सावंत आणि महेशकुमार सावंत (रा. भिकवडी, ता. कडेगाव, जि. सांगली) या सख्ख्या भावांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सूरज साळुंखे हे चांदीचा व्यवसाय करतात. व्यवसायानिमित्त ते आंध्र प्रदेशमध्ये गेले असता, तेथे त्यांची भिकवडीील नवीन सावंत याच्याशी ओळख झाली. नवीनने त्यांना कराडमध्ये दुकान सुरू करणार असल्याचे सांगून, पैशांची मागणी केली.
आपण भागीदारीत व्यवसाय सुरू करू, असेही सांगितले. सूरज यांनी नवीनचा भाऊ महेश याच्याशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून 15 लाख आणि स्वत:जवळचे 15 लाख, असे एकूण 30 लाख रुपये सूरज यांनी नवीनला 16 जानेवारी 2022 रोजी दिले.
साधारण ऑगस्ट 2022 मध्ये महेश व नवीन हे कराडमध्ये सूरज यांच्या दुकानात आले. त्यावेळी सूरज यांनी चांदीबाबत विचारणा केली असता, चांदीसाठी आणखी दहा लाख रुपयांची गरज असल्याचे दोघांनी सांगितले. त्यानुसार सूरज यांनी दहा लाख रुपये दिले. त्याबरोबर अधिक चांदी आणायची असेल, तर आणखी 30 लाख रुपयांची जुळणी करावी लागेल, असे दोघांनी सांगितले.
त्यानंतर सूरज यांनी मित्राकडून आणखी 30 लाख रुपये घेऊन दोघांना दिले. त्यानंतर आणखी दहा लाख रुपये नवीनच्या बँक खात्यावर भरले. सूरज साळुंखे यांनी दोघांना एकूण 90 लाख रुपये देऊनही, दोघांनी सूरज यांना चांदी आणून दिली नाही. भागीदारीत व्यवसायही सुरू केला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, सूरज साळुंखे यांनी फिर्याद नोंदवली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करत आहेत.