कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संरक्षक कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात पुण्यातील दोन वकील जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत घडली. प्रशांत विश्वास भोसले (वय ३४), अमर तुकाराम अलगुडे (वय ३५, रा. धनकवडी, पुणे), अशी मृत वकिलांची नावे आहेत.
न्यायालयीन कामासाठी कोल्हापूरला जाताना अपघात
प्रशांत भोसले आणि अमर अलगुडे हे व्यवसायाने वकील असून ते पुण्यातील न्यायालयात प्रॅक्टिस करतात. न्यायालयीन कामकाजाच्या अनुषंगाने ते रविवारी पुण्याहून कोल्हापूरकडे निघाले होते. दोघांनाही चार चाकी गाडी चालवता येत नव्हती. त्यामुळे ते टीव्हीएस ज्युपिटर मोपेडवरून जात होते. पुणे-बंगळूर महामार्गावर वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत संरक्षक कठड्याला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह दिले नातेवाईकांच्या ताब्यात
अपघातस्थळावरील परिस्थिती पाहता दुचाकी संरक्षक कठड्याला धडकून अपघात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. संरक्षक कठड्यावर आपटल्याने त्या ठिकाणी रक्ताचे डाग देखील दिसून आले. पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी घटनास्थळी भेट दिली. कराड उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.