शेतजमिनीवरील योजनांचा लाभ घ्यायचाय तर मग फार्मर आयडी घेतला का?

0
476
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असेल तर त्यांना फार्मर आयडी अर्थात शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. आयडीमुळे शेतकऱ्यांना कृषीविषयक सेवा, सुविधा तसेच शासकीय योजनांचे लाभ पारदर्शकपणे मिळू शकतील. त्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ नावाने डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील २ लाख ९१ हजार ५५५ शेतकऱ्यांना फार्मर आयडी देण्यात आला आहे.

राज्यातील कृषीक्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या शेतकऱ्यांना लाभ देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र अॅग्रिस्टॅक शासनाकडून योजना राबविण्यात येत आहे. अॅग्रिस्टॅक प्रकल्पात प्रत्येक सातबारा धारक शेतकऱ्याला युनिक फार्मर आयडी दिला जात आहे. शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यासाठी कॅम्पमध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक त्यांच्या खाते उताऱ्याला जोडण्यात आला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे. ज्यांच्या नावे सात-बारा नोंद आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना अॅग्रिस्टॅक क्रमांक अनिवार्य आहे.

फार्मर आयडी यासाठी आवश्यक

शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळवण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड, कृषी इन्फ्रास्ट्रक्चर फंड व शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यास सुलभता येईल. पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल, किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करणे ऑनलाइन पद्धतीने होऊ शकेल, – शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज, निविष्ठा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध होईल.

२ लाख ९१ हजार ५५५ शेतकऱ्यांना फार्मर आयडी

सातारा जिल्ह्यात ४ लाख ४० हजार ६६३ शेतकरी पीएम किसानचा लाभ घेतात. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ९१ हजार ५५५ शेतकऱ्यांना फार्मर आयडी दिले आहेत.

कराड तालुक्यात सर्वाधिक तर महाबळेश्वरात कमी

सातारा जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत कहऱ्हाड तालुक्यातील ४२ हजार ६७० शेतकऱ्यांचे फार्मर आयडी काढण्यात आले आहेत. सर्वाधिक कमी आयडी हे महाबळेश्वर तालुक्यातील ५१४२ एवढे असून क्रमवारीतही तालुका अकराव्या क्रमांकावर आहे.

कोणत्या तालुक्यात आत्तापर्यंत किती नोंदणी?

जावळी : शेतकरी आयडी ६३४५३, : शेतकरी : १६१८२
कराड : शेतकरी आयडी : २४०२९८, शेतकरी : ४२६७०
खंडाळा : शेतकरी आयडी : ६५२७४, शेतकरी : १३१४९
खटाव : शेतकरी आयडी : १८४१०७, शेतकरी : ३३१५१
कोरेगाव : शेतकरी आयडी : ११०२१५, शेतकरी : ३१६९५
महाबळेश्वर : शेतकरी आयडी : ३०७०९, शेतकरी : ५१४२
माण : शेतकरी आयडी : १४८१६१, शेतकरी : २८९८५
पाटण : शेतकरी आयडी : १५७५५१, शेतकरी : ३९११०
फलटण : शेतकरी आयडी : १२६८८६, शेतकरी : ९३७९
सातारा : शेतकरी आयडी : १७५१५६, शेतकरी : ३१४३७
वाई : शेतकरी आयडी : ८२७०१, शेतकरी : २०६५५
एकूण :आयडी : १३८४५११, शेतकरी : २९१५५५