पोलिसांनाही न जुमानता ‘ते’ आपापसात ‘भिडले’; 11 जणांनी तलवार नाचवत केला ‘राडा’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे. कारण चोऱ्या, लुटमारीसोबतच इतर घटना वाढत आहेत. अशा गुन्हेगारांना पोलिसांचा धाक हवा आहे. मात्र, याच्या विरुद्ध घटना रविवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. शहरातील डॉ. आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा येथे 11 युवकांच्या दोन गटांत जोरदार राडा झाला. पोलिसांना न जुमानता त्यांच्यासमोरच युवक एकमेकांना भिडले आणि तलवारी नाचवत एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर कराड शहर पोलिस ठाण्यात 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 8 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

ओमकार उर्फ अहमद सलीम शेख, करण शशिकांत काटरे, प्रज्वल तुळशीनंद कांबळे, अमोल बबन काटरे, हर्ष राकेश कांबळे, आशपाक सलीम शेख, जीवन दुर्योधन कांबळे, आकाश गंगाधर कांबळे (सर्व जण रा.बुधवार पेठ, कराड), अमन साजिद शेख, इरफान अश्रफ कच्छी आणि साहिल आलम मुजावर (सर्व रा.मंगळवार पेठ, कराड) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जोतिबा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर पालकरवाडा हे ठिकाण आहे. या ठिकाणी येथे रविवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही युवकांचे दोन गट एकत्रित आले. या युवकांच्यामध्ये सुरुवातीला शाब्दिक वादावादी झाली. त्यानंतर काही युवकांनी हातात तलवारी घेऊन नाचविल्या. त्यानंतर युवकांच्या दोन गटात मारामारी सुरु झाली. या घटनेची माहिती कराड शहरातील पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिस पथकातील अधिकारी व पोलिसांना मिळाली असता ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी त्यांनी पाहिले की, सुमारे 10 ते 15 युवक हातात तलवार घेऊन एकमेकांच्या दिशेने दगडफेक करीत, शिवीगाळ, दमदाटी करीत होते. त्यावेळी त्यांनी युवकांकडे जात त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, तरीही युवक एकमेकांना मारहाण करू लागले. गटनेचे गांभीर्य ओळखल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी आणखी पोलिस बंदोबस्त मागविला. दरम्यान काही वेळेनंतर आणखी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच काही युवकांनी तेथून धूम ठोकली. यावेळी पोलिसांनी काहींचा पाठलाग करत 8 युवकांना ताब्यात घेतले. तर या प्रकरणी 11 जणांवर गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत. या घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.