पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद धरणक्षेत्रात पीक संरक्षणासाठी वीजप्रवाह सोडलेल्या तारेच्या कुंपणाला स्पर्श करणाऱ्या दोन गव्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. पाटण तालुक्यातील सळवे गावानजीकच्या बोर्गेवाडी येथे घडलेल्या घटने प्रकरणी दोघांवर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.
सत्यवान ज्ञानदेव कदम व लक्ष्मण तुकाराम बोरगे (रा. बोर्गेवाडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आल्याचीनावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील महिंद धरणालगत असलेल्या गावांमधील शेतकरी वन्यप्राण्यांना रोखण्यासाठी विविध क्लृप्त्या लढवीत आहेत. त्यातच शेताभोवती तारेचे कुंपण घालून त्यामध्ये वीजप्रवाह सोडण्याचा प्रकारही काही शेतकऱ्यांकडून केला जात आहे. बोर्गेवाडीत याच प्रकारामुळे दोन गव्यांचा बळी गेला. शनिवारी रात्री बोर्गेवाडी येथील शिवारात आलेल्या दोन गव्यांचा वीजप्रवाह सोडलेल्या तारेला स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा धक्का बसून दोन्ही गव्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. त्यावेळी शेतात दोन गवे मृतावस्थेत आढळून आले. रविवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषीकेश व्हनाळे त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृत गव्यांना ताब्यात घेत त्यांचे शवविच्छेदन देखील केले. त्यानंतर त्याच ठिकाणी गव्यांचे दहन करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी सत्यवान ज्ञानदेव कदम व लक्ष्मण तुकाराम बोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांना पाटणचे वनक्षेत्रपाल राजेश नलावडे यांच्यासमोर अधिक चौकशीसाठी नेण्यात आले. उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, सहायक वनरक्षक महेश झांझुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, वनपाल डी. डी. बोडके, अमृत पन्हाळे तपास करीत आहेत.