सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचे 2 गुन्हे उघड, शाहुपूरी डीबी पथकाची कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । रेकॉर्डवरील सराईत मोटारसायकल चोरट्याला शाहुपुरी पोलिसांनी नगरवाचनालय परिसरात जेरबंद केले. त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. अभिजीत उर्फ राहुल राजाराम लोहार (रा. सोमवार पेठ, सातारा), असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

खबऱ्याकडून मिळाली चोरट्याची माहिती

मोटारसायकलच्या चोरीची तक्रार १ जानेवारी रोजी शाहुपूरी पोलीस ठाण्यात नोंद झाली होती. तक्रारीवरून चोरीचा गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा छडा लावण्यातचे निर्देश उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना दिले होते. पोलीस निरीक्षक फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तपासाची सूचना केली होती. गोपनीय माहितीच्या आधारे हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत चोरट्याने केला असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली.

चोरीच्या मोटारसायकलसह संशयित सापडला

संशयित आरोपी हा राजवाडा परिसरात फिरत असल्याची माहिती मिळताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस तातडीने संबंधित ठिकाणी पोहोचले अन् संशयीत आरोपी चोरीच्या मोटारसायकलसह सापडला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने दोन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. यामुळे मोटारसायकल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले. संशयिताकडून 80 हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

डीबी पथकाची चोख कामगिरी

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, निलेश काटकर, जोतीराम पवार, महेश वनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी ही कारवाई केली.