कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील काही गावात अजूनही बिबटे आढळून येत असल्याने नागरिकांच्यात भीतीचे वातावरण आहे. अधूनमधून बिबट्याकडून कधी शेळ्यांवर तर कधी कुत्र्यांवर हल्ले केले जात आहेत. महाराष्ट्रातील कराड तालुक्यातील या बिबट्याकडून राजस्थानच्या गीर जातीच्या गाईंच्या वासरावर हल्ल केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारासकराड तालुक्यातील तळबीड गावच्या हद्दीत MIDC परिसरात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत तळबीड हे गाव आहे. या गावच्या शेतशिवारातून गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या वावरत असलेला शेतकऱ्यांना दिसत आहे. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक राजस्थान येथील लोकांच्या गीर जातीच्या गाईंच्या दोन वासरावर हल्ल केला. या हल्ल्यात दोन्हीही वासराचा जीव गेला.
तळबीड गावच्या हद्दीत एमआयडीसी परिसरात राजस्थान येथील 8 ते 10 लोक सुमारे 50 ते 60 गाई घेऊन काही महिन्यांपूर्वी आले आहेत. एमआयडीसी परिसरातील डोंगरालगत त्यांचे वास्तव्य आहे. याच लोकांच्या दोन वासरांचा बिंबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांसह परिसरातील विविध गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.