सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद नजीक असलेल्या खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील वीज वितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शेतकऱ्यांच्या ऊसाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 2 एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे देखील नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील कोपर्डे येथील गट क्रमांक 469 व 470 मधील शेतकरी बाळू बाबू ठोंबरे व बाळासाहेब दगडू बोडरे यांच्या मालकीचा प्रत्येकी एक-एक एकर ऊस आहे. राज्य विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे जवळून जाणाऱ्या तारांमधे शॉर्ट सर्कीट होऊन आग लागून भस्मसात झाला.
यामुळे दोन्ही शेतकऱ्यांचे जवळपास 3 ते 4 लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटनेचा पंचनामा महसूल विभागाकडून करण्यात येत असून ऊसाची नुकसान भरपाई वीज वितरण कंपनीकडून देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
सध्या वीज वितरण कंपनीकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकाला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कडून लोंबकळणाऱ्या तारा वेळीच ओढून घेतल्या तरीही या घटना टाळता येऊ शकतील असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.