पाटण प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता वाढत चालली असून सिंचनासाठी पाण्याची मागणी वाढत आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला आहे. अनेक धरणांनी तर तळ गाठला आहे. जिल्ह्यात प्रमुख ६ धरणे असून या धरणांची पाणीसाठवण क्षमता १४८ टीएमसीपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश धरणे ही भरली नाहीत. उरमोडी धरणात अवघा साडेसात, तर कण्हेरमध्ये १७ टक्के साठा राहिला आहे. कोयना धरणात १९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यामुळे सध्या सर्वांचेच डोळे मान्सूनकडे लागले आहेत.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणाची क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणातही ९५ टीएमसीपर्यंतच साठा पोहोचला. तशीच स्थिती कण्हेर आणि उरमोडी या धरणाची होती. जिल्ह्यातील या धरणांचेच पाणी पिण्यासाठी आणि सिंचनासाठी जाते. त्यामुळे ही धरणे कृषिक्षेत्राला आधार देणारी ठरतात. पण, गेल्यावर्षी धरणेच न भरल्याने सिंचनासाठी सतत मागणी वाढत गेली. परिणामी गेल्यावर्षी नोव्हेंबरपासून मागणीप्रमाणे सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती होते. यासाठी पाण्याची तरतूद आहे. तसेच धरणातील पाण्यावर टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन पाणी योजना आहेत.
या धरणातील पाणी अधिक करून सांगली जिल्ह्यासाठी जाते. तसेच सोलापूर जिल्ह्यातील योजनेसाठीही कोयनेचे पाणी सोडण्यात येते. सांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी आजही पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सध्या २१०० क्यूसेकने सांगलीसाठी पाणी सोडले जात आहे. याच धरणात आता १८.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. १९.१९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.
जिल्ह्यातील धरणांची स्थिती
कण्हेर धरणात १.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण १७.२२ आहे, तर कण्हेरमधूनही सिंचनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वाई तालुक्यात धोम धरण असून, यामध्ये ४.७४ टीएमसी पाणीसाठा आहे. तरीही सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तारळी धरणात १.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण २५.३२ आहे, तर कोयना धरणात १९.१९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण १८.२ आहे, बालकवडी धरणात ०.१३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण ३.१४आहे, उरमोडी धरणात १ ०.७५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७.५७ आहे.